तीन
सकाळी मी करडे पाटलांचा विहीर-पंप सुरु
व्हायची वाट पहात होतो, तर एकदम ३-४ गावकरी कुठून तरी एकदम उगवले. पंधरा शुभ्र
सदरा-पायजमा, आणि मस्त टोपी. राम राम झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे प्रश्न
चेहऱ्यावर टाकून पाहत होतो, तोच त्यांनी एकदम मुद्द्याला हात घातला.
“ आम्हाला तुमचा संडास पहायचा आहे.”
कुणी कुणाकडे संडास पहायला जात
असल्याचे कधी पाहिले नव्हते. ऐकले सुद्धा नव्हते. आम्ही चेहेऱ्यावरचे हसू लपवून
त्यांना संडास दर्शनास घेऊन गेलो. त्यात बघण्यासारखे काय ते देव जाणे. ३’x३’चे दोन
खड्डे केले होते. आणि टॉयलेटचा
पाईप त्या मध्ये सोडला होता. खड्डा नीट झाकून त्यातून एक पाईप उभा हवेत सोडला
होता. दोन एक महिन्यात पहिल्या खड्ड्यात माती तयार होते. मग पाईप दुसऱ्या खड्ड्यात
सोडायचा. ही माती म्हणजे एक उत्तम खत असतं, निसर्गाने तयार केलेलं. ते काढून सरळ
शेतात पसरवायचं.
कमोड बघून तर त्यांना हसू फुटले. यानंतर बरेच मजेशीर
डायलॉग झाले. पण शेवटी ही शहरातली मंडळी काय काय उद्योग करतात असे भाव त्यांच्या
चेहेऱ्यावर दिसत होते. आमचा चहा मात्र मस्त आवडला त्यांना. त्याचं रहस्य मन्याने घातलेली
भरपूर साखर हे होते. पण चला, या निमित्ताने गावकऱ्यांशी जान-पहचान झाली. जातांना
मनोहर त्यांना गाडीत घेऊन गेला आणि गावात सोडून पुढे तालुक्याला गेला.
मी मग ब्रेकफास्ट आणि स्वैपाक एकत्र करून टाकला.
मस्त पराठे केले आणि वांगे भाजून भरीत केले. आणि अर्थात वरण भाताचा कुकर लावला.
कागद घेऊन मग जरा आखणी करायला सुरुवात केली. या एव्हढ्या जमिनीच्या तुकड्यावर २५-३०
लोकांसाठी घरं बांधायची होती. याच कामासाठी तर आम्ही म्हणजे मी आणि मनोहर पुढे आलो
होतो. प्रत्येक घर म्हणजे एक किंवा दोघांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी अशी अपेक्षा.
म्हणजे एक बेडरूम (बाथरूम सह) आणि एक छोटे किचन एव्हढेच. बाकी सर्व जगणे एकत्रच.
म्हणजे बैठकीची खोली सगळ्यांची कॉमन. पण अजूनही काही कल्पना होत्या. पुण्या-मुंबईतल्या
सर्व लोकांशी अनेक चर्चा झाल्या होत्या, पण प्रत्यक्ष कल्पना आम्हालाच राबवायच्या
होत्या.
भरपूर स्केचेस केली. मग जेवण करून झोपलोच. दुपारी
केव्हातरी मनोहर महाराज अवतरले. आणि तेही आरडा ओरडा करीतच. खुश दिसत होते. ती देशी
शेगडी काम चूल आणलेली होती. आम्ही मग उत्साहाने ती पेटवली. जरा खटपट केल्यावर ती
एकदाची पेटली. थोडा धूर झाला. पण शेवटी छान पेटली. काटक्या, कोळसा आणि थोडेसे
केरोसीन यावर ती पेटत होती. खालच्या स्तरावर आधी काटक्या टाकायच्या, मग थोडे
केरोसीन किंवा स्पिरीट टाकून त्या पेटवायच्या.
त्या जळेपर्यंत वरच्या स्तरावरचा कोळसा पेट घेतो. यामुळे काडी टाकल्याबरोबर शेगडी
पेटते. वाट पहावी लागत नाही.
मग शेगडीवर झक्कास चहा केला. जरा जास्तच मस्त
झाल्यासारखा वाटला. पण ही सुरुवात होती. अजून बरंच काही करायचं बाकी होतं. चहा
पिता पिता मग एक यादीच करायला घेतली. काय काय सुधारणा करायच्या या शेगडीत याची.
एक म्हणजे शेगडी पेटवण्यासाठी यातायात करावी लागू
नये. दुसरं, धूर होऊ नये. तिसरं भांडी काळी पडू नये. चौथं, शेगडी बंद करतांना पटकन
बंद व्हावी. वगैरे वगैरे. मनोहर ती यादी पाहून हबकलाच. “हे शक्य नाही. त्यापेक्षा
गॅसच आणू या. तो नैसर्गिकच आहे” असं
वैतागून म्हणायला लागला. जरा शांत झाल्यावर मी माझ्या काही कल्पना सांगायला
सुरुवात केली. पण त्याच्या चेहेऱ्यावर मात्र “तू काय डॉक्टर आहेस, तुला काय कळणार
या इंजिनिअरच्या अडचणी” असे भाव होते. आता ते खरं होतं, पण माझ्या कल्पना काही
त्याला खोडून काढता येईना. “बरं बघतो, म्हणून फुरंगटून बसला. मी पण मग विषय बदलला.
गॅस काय किंवा कोळसा, केरोसीन काय दोन्ही खनिज इंधने आहेत. केंव्हा तरी संपणारच.
काटक्या काय पुन्हा पुन्हा पिकवता येतात. मनोहरला ते चांगलंच माहीत होते.
रात्री मग आमचा लॅपटॉप काढला. आमच्या मोबाईलवरून इंटरनेटचे
कनेक्शन जोडले. आणि यू ट्यूबवर अशा धूर विरहित लाकडावर चालणाऱ्या चुलींचे डेमो पाहिले.
आता मनोहरला जरा स्फूर्ती येऊ लागली. रात्री मग बराच वेळ आम्ही चर्चा करत बसलो.
आणि मनोहरच बराच वेळ बोलत होता.
सकाळी नाश्ता करून मनोहर परत तालुक्याकडे जायला
निघाला होता. मीच थांबवलं. म्हटलं, थांब. अजून एक दोन आयडिया घेऊन जाऊ. आता
आमच्याकडे दोन तातडीचे प्रश्न होते. एक म्हणजे, अंघोळीसाठी बाथरूम. आणि दुसरं
म्हणजे आमच्या पत्री-खोपटावरचे छत. आता जरी थंड हवामान असले तरी उन्हाळ्यात तापणार
होते. आमचा हा प्रयोग पहायला आणि त्यात भाग घ्यायला बरेच जण वाट पहात होते.
त्यांची राहण्याची म्हणजे झोपण्याची सोय करावी लागेलच. पण महत्वाचं म्हणजे त्यांना
विहिरीवर थंड पाण्याची अंघोळ करायला लावणे बरं नाही. शिवाय ती सोय कमी खर्चाची असावी.
कारण ही तात्पुरतीच असणार होती.
पत्र्यावर उन्हापासून संरक्षणासाठी काय करावं, याचाही
विचार सुरु केला. एकीकडे स्वैपाक करता करता आम्ही कल्पनांचे पतंग उडवायला लागलो.
आणि खिदळायलाही लागलो. करडे पाटील असेच सहज डोकायला आले होते, त्यांना
पण आमच्या विलक्षण विनोदी कल्पना सांगितल्या. “पण तुमच्या डोक्यात असल्या कल्पना
येतात कुठून?” त्यांना पण मजा वाटली. मग मी त्यांना एक थिअरी सांगितली. एखाद्या
गोष्टीवर काही उपाय चटकन सापडत नसेल तर त्याची खिल्ली उडवत उडवत मुक्त विनोदी
विचार केला की उत्तर सापडतेच. आमच्या कल्पना तशा भन्नाट होत्या. म्हणजे उदाहरणार्थ,
माठात पाणी गार होते, तसे घर थंड करायचे तर काय करायला लागेल? एक मोठा (खोलीच्या
पेक्षा मोठा) माठ घ्यायचा, त्याच्या आत म्हणजे पाण्यात एक सिमेंटची खोली बांधायची.
त्याचा दरवाजा माठाबाहेर ठेवायचा. किंवा,
गळ्यापासून पायापर्यंत एक दोन स्तरांचा एक प्लास्टिक पोशाख करायचा. स्तरांमध्ये
पाणी भरायचे. बाहेरचे पाणी गार झाले की आतमध्ये गारवाच. किंवा असे दुस्तरी प्लास्टिकचे
कापड झोपतांना अंगावर घ्यायचे.