Thursday, May 5, 2016

चार

सकाळी सकाळी आम्ही आधी आमची नवीन चूल पेटवली. ती पेटवता पेटवता काही कल्पना सुचल्या. लगेच मनोहरच्या कानावर घालून टाकल्या. मग स्वैपाक करून टाकला. देशी मटका फ्रीजचा उत्तम वापर होत होता. सर्व भाज्या आणि दूध छान ताजे रहात होते. स्वैपाक म्हणजे पोळी, भाजी, आमटी एव्हढाच होता. आमटी पण इन्स्टन्ट होती. म्हणजे डाळीऐवजी फुटाण्याची डाळ किंवा डाळं वापरून केली होती. मनोहरला सांगितल्यावरच कळलं. मग एकत्र बसून परत सगळी योजना कागदावर मांडून घेतली. अग्रक्रम ठरवला.
पहिलं म्हणजे बाथरूम. दुसरं वॉशिंग मशीन. तीन टपरीचे छप्पर. चार झाडं लावणे. पाच घरांचा आराखडा करणे. सहा सूर्य-वायू ऊर्जा स्रोत (म्हणजे आपलं सोलर विंड हायब्रीड हो) उभा करणे. या सर्वांमागे काही तत्व. उर्जेच्या बाबतीत शक्य तो आपली वस्ती पूर्णपणे स्वयंपूर्ण असावी. पेट्रोल, डीझेल, रॉकेल आणि गॅस शक्य तो नाहीच वापरायचा. कारण ही  ऊर्जा केव्हा ना केव्हा संपणार आहे. भाज्या-फळे ही आवारातच पिकवायची. धान्य, तेल-तूप मात्र बाहेरून आणायचे. आणि महत्वाचं म्हणजे स्थानिक लोकांच्या सहभागाने हा प्रकल्प उभारायचा.
मनोहर आणि आमच्या गटातल्या काही वात्रट मंडळीनी या प्रकल्पाला “उद्योगी वृद्धाश्रम” असं नाव दिला आहे. म्हणजे निवृत्त झाले तरी ज्यांना अजूनही काही तरी उद्योग करायची हौस आहे, त्यांचा हा आश्रम !
बाथरूमची सोय कशी करावी यावर मनोहरकडे भरपूर कल्पना होत्या. बहुधा मिलिटरी कँपमधल्या अनुभवामुळे असाव्या. त्यामुळे आता हा प्रोजेक्ट तो बघणार हे नक्कीच होतं. माझ्या काही अपेक्षा म्हणजे त्यात कपडे बदलण्यासाठी एक वेगळी खोली हवी, आणि गरम पाण्यासाठी काही तरी नवी कल्पना हवी, एव्हढं सांगून  टाकलं.
पुढचे दोन दिवस आम्ही पेपर वर्क करीत होतो. वॉशिंग मशीन करायचं म्हणजे फक्त मानवी शक्तीवर चालणारं  मशीन. वीज नको. जरा अवघड आव्हान होतं. पण अशक्य नक्कीच नव्हतं. उद्देश सरळ होता. सोलर-विंड ची वीज जरी मिळाली नाही तरी रोजची कामं ही सहज झालीच पाहिजे. कल्पना काढणे मला सहज जमत होतं. पण अंमलात कोण आणणार? बऱ्याच कल्पना अगदी अवास्तव होत्या. पण मनोहर त्या कल्पनांना वास्तवात आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत होता. आणि इंटरनेटमुळे तर अनेक कल्पना अगदी रेडीमेड मिळत होत्या, अगदी उपकरणांच्या प्रात्यक्षिकासकट ! काही ठिकाणी तर ही उपकरणे कशी करावी याचे पण मार्गदर्शन मिळत होते.
आमच्या गटातली सगळी जण आमचं काय चाललंय ते बघायला फार उत्सुक होती. या सर्व कल्पना त्यांच्यासमोर ठेवून त्यांची संमती आणि पैसे मिळवणे यांची गरजही होती. आमचे कागदी आराखडे थोडेफार तयार होते. मग आम्ही सर्वांना फोनवरून बोलावणे धाडले. या आठवड्याशेवटी तिघं-चोघं येणार असं ठरलं. म्हणजे आता या लोकांची पण व्यवस्था बघायला हवी. महादुला हाक मारली. करडे पाटलांची मदत लागणार होती. ३-४ जण येणार महणजे त्यांची जेवणं, झोपायची व्यवस्था हे बघावा लागणार होतं. जमिनीचा करार केला तेव्हा सगळे एकदा येऊन गेलेच होते. पण आता मुक्काम करणार होते.
करडे पाटलांची एकदा सविस्तर भेट घेतली. सगळा प्लॅन समजून सांगितला. ते नुसते माना डोलावत होते. आणि मधेच हासत होते. त्याना हे सगळं मजेशीर वाटत असावे. स्पष्टच विचारले तेव्हा “ह्ये लई भारी चाललंय. खेड्यातल्या लोकांना शहरात जायची घाई, आणि शहरातल्या लोकांना खेड्याची ओढ.” असं म्हणून खो खो हसत सुटले. पण शहरातल्या प्रमाणे इथे सिनेमा नाही, मॉल नाही, गाण्या-बजावण्याचे कार्यक्रम नाहीत, हे मात्र त्यांनी बजावले. सुदैवाने डिश टीव्हीमुळे करमणुकीचा प्रश्न नव्हता. आणि इंटरनेटवर आता सुपरमॉल असतो. शहरात ज्येष्ठ नागरिकांचे काय प्रश्न असतात ते खेड्यातल्या लोकांना समजणं अवघड असतं. सामुहिक जीवन जगण्यात कसा वेळ जातो आणि कसं छान वाटतं, ते आम्हाला माहीत होतं. पण हे सगळं आता प्रत्यक्षत येईल तेव्हा खरं.
जेव्हा ते एकदाचे सकाळीच आले तेव्हा गाडीतून दिलीप, सुरेश, सुभाष उतरलेच पण त्यांच्या बरोबर विजया पण उतरली, आणि आम्ही पहातच राहिलो. ही कशी आली? “अरे, काल रात्री अचानक ठरलं. मग लगेच दिलीपला कळवलं आणि आले. म्हटलं तुम्हाला सरप्राईझ देऊ या.”  ‘माझे आई, इथे जेमतेम अडचणीत ३-४ पुरुषांची सोय होऊ शकते. आता तुझी काय व्यवस्था करू?’ हे सगळं मनातल्या मनात. मुख्य महणजे आम्ही विहिरीवर आंघोळ करत होतो. हिच्या अंघोळीचं काय करायचं? विजया म्हणजे आमच्या एका दिवंगत मित्राची, राजारामची  बायको. एकदम झणझणीत स्वभावाची, स्पष्टवक्ती आणि बाणेदार, पण दिलदार. आल्या आल्या तिने ताबा घ्यायला सुरुवात केलीच, शंभर प्रश्न विचारून. बाई पाहून महादूची बायको तर आलीच पण करडे पाटलांच्या वाड्यावरचा निरोपही घेऊन आली. ती वाड्यावर गेल्यावर मग सगळ्यांना तोंड फुटले.
आमचा झकास चहा होईपर्यंत विजया आणि तिच्याबरोबर पाटलीण बाई आणि दोन-तीन तरुण बायका पण येतांना दिसल्या. त्यांची आणि आमची तशी समोरासमोर पहिलीच भेट होती. त्या बायकांनी आमच्यासाठी गरम शिरा आणला. वर कुरडया आणि पापड सुद्धा. विजयाने आग्रहाने त्याना बसवून घेतले, सगळ्यांची ओळख करून दिली. हळू हळू त्या मग बोलायला लागल्या. आमची झोपडी आणि टॉयलेट यांची भेट, सैर आणि तपासणी झाली. आमच्या शेगडीची भरपूर चेष्टा झाली. विजयाने मग स्वैपाकाचा ताबा घेतला आणि आम्ही इकडे आमची गप्पांची मैफल सजवायला सुरुवात केली. विजयाच्या बडबड्या आणि उत्साही स्वभावाने तिने सगळ्या करडे- पाटील  खानदानाला आपलंसं केलंच होतं.  
दुपारी जेवण मात्र झक्कास झाले. आमच्या शेगडीची टिंगल न होता चांगलीच स्तुती चालली होती. मनोहरला एकदम स्फुरण चढले. आमच्या शेगडीचे पुढचे सर्व प्रयोग त्याने रंगवून सांगितले.  समस्त स्त्री वर्ग प्रभावित झाल्याचे पाहून मनोहरपंत एकदम खुश जाहले. नाही म्हणायला एका चाणाक्ष गृहिणीने “बघू बघू” असा चेहरा केला होता, ते अस्मादिकांच्या नजरेतून सुटले नाही.  
जेवणं झाल्यावर मग आमची मीटिंग सुरु झाली. सुरेश म्हणजे महा-चिकित्सक. आणि कंजूस. त्याच्या प्रश्नांना उत्तरे देता देता मनोहर एकदम भडकला. दिलीप तसा एकदम समंजस आणि समतोल विचारी मनुष्य. त्याने जरा सांभाळून घेतले. विजयाला कधी नव्हे ते सगळा आराखडा खूप आवडला होता. पण तिने केलेल्या एका सूचनेने रण माजले. लोकांचा सहभाग कसा घ्यावा अशी चर्चा होती. आणि तिची सुचना होती, एक मंदिर बांधायची. विजया तशी धार्मिक वगैरे नव्हती. पण हे तिला कसं सुचलं कोण जाणे. आमच्यापैकी सुभाष सोडला तर कोणी भाविक नव्हते. पण सर्वांच्या वयाचा व गावकऱ्यांचा विचार केला तर मंदीर होणे गरज होती. पण पैसे कोण देणार?
इतका वेळ गप्प असलेला सुभाष एकदम उभा राहिला. “मंदिरासाठी माझी पहिली देणगी, १० लाख रु.” आमच्या या निसर्ग प्रकल्पाच्या वर्गणीव्यतिरिक्त ही देणगी म्हणजे मोठीच गोष्ट. मंदीर आमच्यासाठी तर फायद्याचे होतेच, पण शिवाय तेथील स्थानिकांना पण त्याचा उपयोग होणार होते. तसे गावात एक मारुती आणि एक महादेवाचे मंदिर होते. मग आम्ही गणपती मंदिर स्थापन करायचे ठरवले. आणि मग प्रत्येकालाच उत्साह आला. जमिनीचे नकाशे काढले आणि मंदिराची जागा ठरवण्यात सगळे मग्न झाले. परत विजयानेच सूचना केली कि जागा, दिशा हे सगळं ठरवतांना गावकऱ्यांना सहभागी करणे जरुरी आहे.
मी लगेच करडे पाटलांना शोधून काढून मिटिंग मध्ये घेऊन आलो. आणि मग काय रंग चढला म्हणता. करडे पाटील तर खुश झालेच. लगेच त्यांनी चार गावकरी, सरपंच यांना बोलावणे धाडले. पुढची बोलणी, रात्रीचे जेवण आणि विजयाची झोपायची सोय या सगळ्यांची जबाबदारी पाटलांकडे आपोआप आली. पण गावकऱ्यांशी या निमित्ताने जरा दोस्ती झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पण बदलले. त्यांना आमच्या प्रयोगात रस निर्माण झाला. रात्री जातांना तरी एकाने विचारलेच, ‘हे निसर्ग निसर्ग काय हाये तुमचं? आम्हाला शेहेराची वढ आणिक तुमाला हि खेड्याची आस. आपल्याला तर काई समजेना ब्वा.’
दुसरा दिवस परत चर्चा-बैठका या मधेच गेला. पण मंडळी संध्याकाळी परत जाईपर्यंत बऱ्याच गोष्टी पक्क्या झाल्या होत्या. संध्याकाळी मग त्यांच्याच बरोबर मी आणि मनोहर देखील शहराकडे रवाना झालो. पहिला टप्पा अंदाज घेणे, ग्रामीण जीवनाची चव बघणे, काही आराखडे करणे यासाठी होता, आणि तो व्यवस्थित पार पडला होता. येतांना गाडीत मी आणि मनोहरने सगळे अनुभव तिखट मीठ लावून सांगितले आणि एकमेकांची टिंगल करीत शेवटी एका ब्रेक साठी घरी परतलो. आता बाकी सब ब्रेक के बाद.

Sunday, January 31, 2016

तीन

सकाळी मी करडे पाटलांचा विहीर-पंप सुरु व्हायची वाट पहात होतो, तर एकदम ३-४ गावकरी कुठून तरी एकदम उगवले. पंधरा शुभ्र सदरा-पायजमा, आणि मस्त टोपी. राम राम झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे प्रश्न चेहऱ्यावर टाकून पाहत होतो, तोच त्यांनी एकदम मुद्द्याला हात घातला. 

“ आम्हाला तुमचा संडास पहायचा आहे.”

कुणी कुणाकडे संडास पहायला जात असल्याचे कधी पाहिले नव्हते. ऐकले सुद्धा नव्हते. आम्ही चेहेऱ्यावरचे हसू लपवून त्यांना संडास दर्शनास घेऊन गेलो. त्यात बघण्यासारखे काय ते देव जाणे. ३’x३’चे दोन खड्डे केले होते. आणि टॉयलेटचा पाईप त्या मध्ये सोडला होता. खड्डा नीट झाकून त्यातून एक पाईप उभा हवेत सोडला होता. दोन एक महिन्यात पहिल्या खड्ड्यात  माती तयार होते. मग पाईप दुसऱ्या खड्ड्यात सोडायचा. ही माती म्हणजे एक उत्तम खत असतं, निसर्गाने तयार केलेलं. ते काढून सरळ शेतात पसरवायचं.

कमोड बघून तर त्यांना हसू फुटले. यानंतर बरेच मजेशीर डायलॉग झाले. पण शेवटी ही शहरातली मंडळी काय काय उद्योग करतात असे भाव त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होते. आमचा चहा मात्र मस्त आवडला त्यांना. त्याचं रहस्य मन्याने घातलेली भरपूर साखर हे होते. पण चला, या निमित्ताने गावकऱ्यांशी जान-पहचान झाली. जातांना मनोहर त्यांना गाडीत घेऊन गेला आणि गावात सोडून पुढे तालुक्याला गेला.

मी मग ब्रेकफास्ट आणि स्वैपाक एकत्र करून टाकला. मस्त पराठे केले आणि वांगे भाजून भरीत केले. आणि अर्थात वरण भाताचा कुकर लावला. कागद घेऊन मग जरा आखणी करायला सुरुवात केली. या एव्हढ्या जमिनीच्या तुकड्यावर २५-३० लोकांसाठी घरं बांधायची होती. याच कामासाठी तर आम्ही म्हणजे मी आणि मनोहर पुढे आलो होतो. प्रत्येक घर म्हणजे एक किंवा दोघांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी अशी अपेक्षा. म्हणजे एक बेडरूम (बाथरूम सह) आणि एक छोटे किचन एव्हढेच. बाकी सर्व जगणे एकत्रच. म्हणजे बैठकीची खोली सगळ्यांची कॉमन. पण अजूनही काही कल्पना होत्या. पुण्या-मुंबईतल्या सर्व लोकांशी अनेक चर्चा झाल्या होत्या, पण प्रत्यक्ष कल्पना आम्हालाच राबवायच्या होत्या.

भरपूर स्केचेस केली. मग जेवण करून झोपलोच. दुपारी केव्हातरी मनोहर महाराज अवतरले. आणि तेही आरडा ओरडा करीतच. खुश दिसत होते. ती देशी शेगडी काम चूल आणलेली होती. आम्ही मग उत्साहाने ती पेटवली. जरा खटपट केल्यावर ती एकदाची पेटली. थोडा धूर झाला. पण शेवटी छान पेटली. काटक्या, कोळसा आणि थोडेसे केरोसीन यावर ती पेटत होती. खालच्या स्तरावर आधी काटक्या टाकायच्या, मग थोडे केरोसीन किंवा स्पिरीट  टाकून त्या पेटवायच्या. त्या जळेपर्यंत वरच्या स्तरावरचा कोळसा पेट घेतो. यामुळे काडी टाकल्याबरोबर शेगडी पेटते. वाट पहावी लागत नाही.

मग शेगडीवर झक्कास चहा केला. जरा जास्तच मस्त झाल्यासारखा वाटला. पण ही सुरुवात होती. अजून बरंच काही करायचं बाकी होतं. चहा पिता पिता मग एक यादीच करायला घेतली. काय काय सुधारणा करायच्या या शेगडीत याची.
एक म्हणजे शेगडी पेटवण्यासाठी यातायात करावी लागू नये. दुसरं, धूर होऊ नये. तिसरं भांडी काळी पडू नये. चौथं, शेगडी बंद करतांना पटकन बंद व्हावी. वगैरे वगैरे. मनोहर ती यादी पाहून हबकलाच. “हे शक्य नाही. त्यापेक्षा गॅसच आणू या. तो नैसर्गिकच  आहे” असं वैतागून म्हणायला लागला. जरा शांत झाल्यावर मी माझ्या काही कल्पना सांगायला सुरुवात केली. पण त्याच्या चेहेऱ्यावर मात्र “तू काय डॉक्टर आहेस, तुला काय कळणार या इंजिनिअरच्या अडचणी” असे भाव होते. आता ते खरं होतं, पण माझ्या कल्पना काही त्याला खोडून काढता येईना. “बरं बघतो, म्हणून फुरंगटून बसला. मी पण मग विषय बदलला. गॅस काय किंवा कोळसा, केरोसीन काय दोन्ही खनिज इंधने आहेत. केंव्हा तरी संपणारच. काटक्या काय पुन्हा पुन्हा पिकवता येतात. मनोहरला ते चांगलंच माहीत होते.

रात्री मग आमचा लॅपटॉप काढला. आमच्या मोबाईलवरून इंटरनेटचे कनेक्शन जोडले. आणि यू ट्यूबवर अशा धूर विरहित लाकडावर चालणाऱ्या चुलींचे डेमो पाहिले. आता मनोहरला जरा स्फूर्ती येऊ लागली. रात्री मग बराच वेळ आम्ही चर्चा करत बसलो. आणि मनोहरच बराच वेळ बोलत होता.

सकाळी नाश्ता करून मनोहर परत तालुक्याकडे जायला निघाला होता. मीच थांबवलं. म्हटलं, थांब. अजून एक दोन आयडिया घेऊन जाऊ. आता आमच्याकडे दोन तातडीचे प्रश्न होते. एक म्हणजे, अंघोळीसाठी बाथरूम. आणि दुसरं म्हणजे आमच्या पत्री-खोपटावरचे छत. आता जरी थंड हवामान असले तरी उन्हाळ्यात तापणार होते. आमचा हा प्रयोग पहायला आणि त्यात भाग घ्यायला बरेच जण वाट पहात होते. त्यांची राहण्याची म्हणजे झोपण्याची सोय करावी लागेलच. पण महत्वाचं म्हणजे त्यांना विहिरीवर थंड पाण्याची अंघोळ करायला लावणे बरं नाही. शिवाय ती सोय कमी खर्चाची असावी. कारण ही तात्पुरतीच असणार होती.


पत्र्यावर उन्हापासून संरक्षणासाठी काय करावं, याचाही विचार सुरु केला. एकीकडे स्वैपाक करता करता आम्ही कल्पनांचे पतंग उडवायला लागलो. आणि खिदळायलाही लागलो.  करडे पाटील असेच सहज डोकायला आले होते, त्यांना पण आमच्या विलक्षण विनोदी कल्पना सांगितल्या. “पण तुमच्या डोक्यात असल्या कल्पना येतात कुठून?” त्यांना पण मजा वाटली. मग मी त्यांना एक थिअरी सांगितली. एखाद्या गोष्टीवर काही उपाय चटकन सापडत नसेल तर त्याची खिल्ली उडवत उडवत मुक्त विनोदी विचार केला की उत्तर सापडतेच. आमच्या कल्पना तशा भन्नाट होत्या. म्हणजे उदाहरणार्थ, माठात पाणी गार होते, तसे घर थंड करायचे तर काय करायला लागेल? एक मोठा (खोलीच्या पेक्षा मोठा) माठ घ्यायचा, त्याच्या आत म्हणजे पाण्यात एक सिमेंटची खोली बांधायची. त्याचा दरवाजा माठाबाहेर ठेवायचा.  किंवा, गळ्यापासून पायापर्यंत एक दोन स्तरांचा एक प्लास्टिक पोशाख करायचा. स्तरांमध्ये पाणी भरायचे. बाहेरचे पाणी गार झाले की आतमध्ये गारवाच. किंवा असे दुस्तरी प्लास्टिकचे कापड झोपतांना अंगावर घ्यायचे. 

Thursday, January 14, 2016

दोन

सकाळी म्हणजे पहाटे लख्ख जाग आली तीच कोंबड्याच्या आरवण्याने. बाहेर आलो आणि हा:, इथे आल्याचं सार्थक झालं. सगळीकडे नीरव शांतता. छे: हे शब्द फार लहान आहेत ती शांतता अनुभवायला. मी नुसताच एका दगडावर बसून होतो. समोर एका दिशेला किंचित फटफटायला सुरुवात झाली होती. आणि बाकी सगळी निळी शांतता. लांब कुठेतरी काही पक्षी, मोर यांचे आवाज येत होते. बस बस! यार आम्हाला हेच हवे होते. या शांततेमध्ये हजार प्राणायामांची ताकद होती. मनोहर देखील हळूच येऊन बसला. सूर्य महाराज वर आल्यावर मग आम्ही प्रसन्न हसलो. आणि परत खोपटात.
सगळं आटपून होतंय तो लगेच मनोहर महाराजांना भूक लागली. कालच्या बाजारातले बटाटे बाहेर काढले. खोपटाच्या बाहेर एक शेकोटी पेटवली. आणि बटाटे भाजायला सुरुवात केली. मन्याने लगेच ते काम उत्साहाने हातात घेतले. मी चहाकडे वळलो. आणि काय राव. त्या दिवशी आमचा खरा निसर्ग-नाश्ता झाला. मीठ लावलेले व भाजलेले बटाटे आणि रताळी. ऐसा मजा आया. पण पोट भरल्यावर बघितलं, जरा धूर झाला होता. या धुराचा वास सुद्धा मस्त येत होता. पण नाही. हा धूर सुद्धा चांगला नाही. डोक्याच्या पोतडीत काय सापडतंय ते बघायला लागलो. दोन चार कल्पना उगवल्या होत्या. ठीक आहे. करून बघू या. मनोहरला पण त्या लगेच आवडल्या.  ते एक नवलंच. कारण काही नवीन करायचं ठरवला कि पहिला बहुधा नकारच ! नंतर हजार प्रश्न आणि शंका असतात. मिलिटरीमध्ये डोकं वापरायला बंदीच असते कि काय? 
बुलेट फटफटीचा आवाज आला आणि करडे पाटील हजर. तेही हाफ पँटमध्ये. मनोहर पण अर्ध्या चड्डीचा वेडा. मग काय चहाबरोबर पुन्हा एकदा गप्पा. गाडीच्या डिक्कीतून त्यांनी दोन लांब मुळे काढले. तेव्हढ्यात महादू हजर झाला. मालक आले होते ना. आमच्याकडे पाण्यासाठी दोन प्लास्टिकच्या बादल्या आणि एक माठ एव्हढेच होते. त्याने ते लगेच भरून टाकले. टॉयलेटमध्ये पाणी भरले. आणि आज्ञाधारकपणे उभा राहिला. चहा दिला तरी तो घेईना. “तुम्ही दूध कुठनं आनलं?” पाटील गरजले. आणि ‘पावडर’ ऐकून ते रिकाम्या कपाकडे हळहळत पाहू लागले. मग लगेच महादुला ऑर्डर. “उद्यापासून रोज यांच्याकडे आपले घरचे दुध घालायचे.” आज ना उद्या आम्हाला ही व्यवस्था करायचीच होती. “अवो, घरी दोन दोन गायी-म्हशी हायेत, आन आमी दूध इकत पन नाही.”  आम्ही पण बाजारभावाप्रमाणे पैसे द्यायचं ठरवून टाकलं.
करडे पाटील जाईपर्यंत विहिरीचा पंप सुरु झाला. मग मन्या लगेच उड्या मारीत गेला. मी नाईलाजानं पोचलो. पंपाच्या थंड पाण्याखाली उभं राहतांना शहारे आले. पण लगेच त्यातच मजा वाटू लागली.  मग कपडे पण धुवून तिथेच वाळत घातले. मन्याने तिथेच दाढी पण उरकली. आम्ही मग मस्त मोठ्या-मोठ्याने गाणी म्हणत शेताला फेरी मारत घरी परतलो. असं आम्ही गेल्या कित्येक दशकात केलं नव्हतं. घरी आलो तर मन्याचा फोन वाजत होता. आणि पुढचे १५ मिनिटे तो पडत्या चेहेऱ्याने हुं हुं करत होता. तो वहिनींचा होता हे सांगण्याची गरजच नव्हती.   आल्यापासून आम्ही दोघांनी आमचे फोन मुद्दामच बंद ठेवले होते. त्याने कधी चालू केला कोण जाणे. आता मी फोन चालू करून आधीच आपणहून घरी फोन करून पुढचे (सं)भाषण टाळायचा (अयशस्वी) प्रयत्न  केला. असो.

मनोहर मग गावात गेला आणि मी स्वैपाकास लागलो. थालीपीठे, चवळीची उसळ आणि मुळ्याची कोशिंबीर (हा: हा:  हा काय बेत आहे??) करावी म्हटलं तर किसणी कुठे आणली होती. महादुला विचारायला गेलो तर त्याने मुळे किसुनच आणून दिली आणि वर एका मडक्यात दही पण आणून दिले. वा:!  माझी थालीपीठाची धडपड पाहून “कशा पायी एव्हडी गडबड? म्या भाकऱ्या आणून देतो न जी” असं म्हणायला लागला. त्याला काय माहिती आम्हाला काय किडा चावलाय? खरी पंचाईत खाली बसून थालीपीठे थापण्यात होती. एव्हढी योगासने करतोय तरी शरीर आपले कडक ते कडकच. जरा खाली बसलं कि रग लागलीच. आणि सभोवतालचा पसारा पाहून तर डोकं फिरायची वेळ आली. सगळीकडे पीठ, तेल सांडलेलं. कचरा तिथेच. शेवटी एकदाचा स्वैपाक संपवला आणि साफसफाई करून “साहेबांची” वाट पहात बसलो.
मनोहर आला एकदाचा. सोबत एक टेम्पो आणि दोन माणसं पण. लोखंडी खाटा आणि एक लोखंडी टेबल उतरवून घेतलं. आणि काय काय घेऊन आला होता. पण आता जेवायची घाई होती त्याला. जेवण विश्रांती झाल्यावर मग आम्ही आमचे कुकिंग टेबल कम डायनिंग टेबल कम स्टोअर प्लेस अशी त्या लोखंडी टेबलाची व्यवस्था एका कोपऱ्यात लावली. दोन तीन प्लास्टिकची स्टूलं ठेवली. एका ट्रंकेत सगळी धान्ये, मसाले, पीठं यांचे डबे, पिशव्या निट लावल्या. पण बाहेरच्या बाजूला बादलीतल्या पाण्यात भांडी धुणे कसं तरी वाटत होतं. एक सिंक पाहिजे होतं. अजून बरंच काही करायचं होतं!  
मग एक मोठा माठ आणला होता, त्याचा फ्रीज केला. कसा? सोप्प आहे. भाज्या आणि घट्ट बंद बाटलीतून पाणी आणि दुध एका लांबट मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत घातलं. पिशवीचं तोंड बांधून माठाबाहेर लोंबकळत ठेवलं. आणि मग माठ पाण्याने भरून घेतला. झाला आमचा फ्रीज. यात बर्फ वगैरे होणार नव्हतं पण भाज्या आणि दूध ताजं राहणार होते. हा प्रयोग मनोहर नीट बघत होता.  त्याच्या शंका सुरु झाल्याच. “पण पाणी संपलं तर? आणि दूध नासलं तर? आज पाणी आहे. उद्या नसेल. मग?”
“जरा थांब, आपण प्रयोग करतो आहोत असं समज. दोन-तीन दिवसात सगळं स्पष्ट होईल. आणि पाणी हे आपल्याला रिसायकल करता येईल. माठाखाली एक बादली ठेवली कि झालं!”
खरा प्रश्न त्याला बर्फाचा पडला असावा. पण सांगणार कसं? खरं म्हणजे बर्फ कधी आणि किती लागतं? आपल्या घराच्या फ्रीजचा वापर ९०% दूध आणि भाज्या, चिकन साठीच होतो. बर्फ कधीतरीच. उन्हाळ्यात आईसक्रिम किंवा चॉकलेटसाठी ! बस! एव्हढ्यासाठी दरमहा ५०० ते १००० रु. भरणे जरा अन्यायच आहे. हा आमचा फ्रीज जवळ जवळ फुकट आहे. फक्त आता त्याची उपयुक्तता सिद्ध होणे बाकी होते. म्हणजे मनोहरला. मी हा प्रयोग घरी केलाच होता. आणि १००% यशस्वी झाला होता.
आता दुसरा प्रश्न गॅसचा होता. सध्याचा आमचा छोटा गॅस जेमतेम १५-२० दिवस पुरला असता. तोपर्यंत काही तरी स्थानिक सुरक्षित सोय व्हायला हवी होती.  कल्पना होत्या पण प्रयोग करायला हवे होते. मी एक कागद घेतला आणि काही आकृत्या तयार केल्या. आणि चहा (हा हा) करीपर्यंत मनोहरला समजावून सांगत बसलो. मनोहरच्या शंका आणि प्रश्नांची उत्तरे देता देता माझी भंबेरी उडाली. पण शेवटी मी माघार घेतली आणि सांगितलं कि बस आता यापुढे माझे डोके  चालत नाही. आता मनोहर साहेब खुशीत आले. “आता मी बघतो”  इंजिनियर तो आणि त्याच्या क्षेत्रात लुडबुड माझी. कशी चालेल त्याला (किंवा कुणालाच)? लगेच गाडी काढून तो गावात गेला. मी आपला निसर्गाशी गप्पाटप्पा करायला बाहेर पडलो.
एक ओढा लागला त्याच्या काठा-काठाने चालू लागलो तर तो मला अशा एका अफलातून ठिकाणी घेऊन गेला कि बस. एक टेकडीला वळसा घालून तो एका तळ्याच्या काठी घेऊन गेला. ते तळे एका बाजूला घाण दिसत होते, पण दुसऱ्या बाजूला मात्र अतिशय सुंदर होते. संध्याकाळची वेळ. वारा तसा नव्हताच. वर निळ्याभोर आकाशात पक्षी आणि खाली मी. समोर स्तब्ध पाणी. कुठून तरी म्हशी आणि मागे एक गुराखी आल्यावर मी मग वळलो. येतांनाचा ओढा हि सापडेना. मग त्या गुराख्याला विचारीत विचारीत एकदाचा घरी पोचलो.

आता जेवणाचा प्रश्न होता. खिचडीचा पर्याय होताच. शिवाय दोन तीन कांदे गॅसवर भाजले. खिचडीवर लसणाची फोडणी घातली. पापड आणलेच नव्हते. आणि महादुला मागणे म्हणजे लाज शिवेवर टांगणे. तेव्हा मिरचीचा ठेचा केला. मनोहर आला तो वैतागूनच. त्याला कोणी चांगला फॅब्रीकेटर भेटला नव्हता.  भेटले ते असे की यानेच डोके धरून माघार घ्यावी.  मी त्याची समजूत घातली. असे डोके लावून काम करणारी माणसे तालुक्याच्या गावीच मिळतील. खिचडी, कांदा, ठेचा पाहून गडी खुशीत आला.  मग दुपारचे डिझाईन काढून आम्ही परत त्यात डोकं घालून बसलो, अगदी चांगली झोप येईपर्यंत. 

Friday, June 5, 2015

आमचे निसर्ग प्रयोग - निसर्गाशी मैत्री करून जीवन मजेत जगण्याचे अनुभव


आमचे निसर्ग प्रयोग
मी  आणि माझे मित्र काही दिवसांपासून एका खेड्यामध्ये सामुहिक नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयोग करीत आहोत, त्याची ही कहाणी. कशी वाटते ते कळवत रहा. 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाग एक

आमची गाडी मलदापूरला पोचली आणि गाडी पाहून महादू आमच्या मागे मागेच आला. आमचा प्लॉट तसा गावाबाहेर होता. आणि तिथे एक पत्र्याची मोठी खोली आणि मागे एक टॉयलेट मागच्या खेपेस बांधून ठेवले होते. आम्ही गाडीतून समान काढले, खोलीत नेऊन ठेवले. आता पुढे काय? मनोहर माझ्याकडे पहात होता. अन मी त्याच्याकडे. खाली महादूने जमीन धोपटून ठेवली होती. सारवून पण घेतली होती. पण आम्हाला काही खाली बसवेना. मनोहरची नजर सांगत होती, “घ्या, निसर्ग जीवन पाहिजे ना?”

तेव्हढ्यात महादू आला. हातातले कांबळे खाली अंथरून ‘बसा बसा’ सांगू लागला. मनोहरने शांतपणे बॅग उघडून एक चादर काढली. महादू तसाच मागे पळाला. आम्ही चादर अंथरून बसतच होतो. तर तो एक खाट घेऊन आला. आम्हीच लाजलो. आम्ही मग खाटेवरच बसलो. परत महादू गेला आणि कळशी घेऊन आला. आम्ही ग्लास काढले. मनोहर बिसलेरीची बाटली बॅगेत शोधात होता. माझी नजर पाहून थबकला आणि मुकाट्याने कळशितले पाणी पिऊ लागला.
आता काय करायचे? मोठे अवसान आणून निसर्ग जीवन जगायला इथे आलो होतो. म्हणजे आपण होऊनच. मला चहाची सुरसुरी कधीपण येते. महादुला राम राम केला. त्याची मदत लागणार तर होतीच. पण आधी विचार करायला हवा होता. छोटा गॅस काढला. चहाची भांडी, दुध पाऊडर, साखर काढून मग मस्त चहा केला. {छे!  चहा आता कमीच केला पाहिजे.} जरा हुश्श केले. मनोहरची टकळी आणि चुळबुळ चालूच होती.

मनोहर यादी घेऊन बाहेर पडला. तसं आमचं ठरलंच होतं. त्याने बाहेरची आणि मी घरातली कामं करायची. मी पण आधी चवळी काढून एका पातेल्यात भिजत घातली. आणि जेवणासाठी मुगडाळ व तांदूळ काढले. आधी किचन लावायला पाहिजे. मग बाहेरचं बघू. महादूला हाक मारली.  हा हरहुन्नरी माणूस करडे पाटलांनीच बघून दिला होता. मदतीला. लागतील तसे पैसे द्यायचे बोलीवर.  महादूच्या मदतीने “घरात” आणि टॉयलेटमध्ये पाणी ठेवले. मागच्या खेपेस जो काही गवंडी मिळाला त्याच्याकडून हे टॉयलेट बांधून घेतले होते. आमची कमोडची सवय. गवंड्याने कसे तरी ते जोडलेले. पण ठीक आहे. हे तर हे.

महादूला एक माठ आणायला सांगितला.  आणि इकडे मग खिचडी शिजायला ठेवली. तिखट मीठ वगैरेच्या पुड्याच आणल्या होत्या. महादू आणि मनोहर एकदमच आले. मनोहरने गावातल्या दुकानातून जे जे मिळाले ते सर्व आणले. “भाव” न करता सगळी किंमत एकदम दिल्याने दुकानदार बघतच राहिला होता म्हणे. पण शेवटी नीट विचारपूस करून चहा तर पाजलाच, शिवाय पैसे ही कमी केले. दुकानदार कानडी अप्पा होता. महादूने सगळ्यांची किंमत विचारल्यावर लक्षात आले कि गावकऱ्यांपेक्षा जास्त पैसे घेतले होते. मनोहरचा नूर उतरला. पण मी आणि महादू हसत राहिलो.  आमची खिचडी बघून महादू एकदम बडबड करत माघारी गेला आणि येतांना चांगल्या ४ भाकऱ्या आणि ठेचा घेऊन आला. मागनं त्याची मुलगी पिठलं, ताक आणि कांदा ही घेऊन आली.

मग बळेबळे आम्ही महादुला जेवायला ठेऊन घेतले. नाहीतर आम्ही काय एव्हढे जेवणार होतो? मी ६२ चा तर मनोहर ६३चा. महादू वाटत होता ५०-५२चा. वय विचारलं तर तो म्हणाला ७२. आम्ही उडालोच. त्याची एक मुलगी शहरात दिली होती. जावई एका कारखान्यात काम करी होता. आणि “दर महिन्याला” रोख पगार घेत होता. खुश होता महादू. पण त्याला हेच समाजत नव्हतं कि हे चांगले साहेब लोक या खेड्यात आणि खोपटात कशाला आलेत? काय सांगणार त्याला कि आम्हालाच आता ते खोटं खोटं जीवन नकोसं झालंय. जरा निसर्गाच्या सान्निध्यात मस्त जगायचं आहे. जसं हवं तसं राहायचं आहे. दोस्त, समविचारी, समानधर्मी स्त्री-पुरुषांना बरोबर घेऊन  एकत्र झकास दुसरी इनिन्ग्स खेळायची आहे. या जीवनाचा रस पुरेपूर चोखायचा आहे.  

जेवणं झाल्यावर जरा आडवा होऊन, (म्हणजे मी बाजेवर व मन्या खाली) तडक गाडी तालुक्याच्या गावाकडे वळवली. मनोहरने सकाळीच दोन लोखंडी कॉटची मागणी नोंदवून ठेवली होती. दोघांना दोन लोखंडी पलंग. महादूची बाज परत करायलाच हवी होती. मग आणखी काही लोखंडी समान मागवले. खोपटाची  मापं सकाळीच घेऊन ठेवली होती. मग  इतर बरेच सटर-फटर सामान खरेदी करून डिक्कीत टाकले. एक कंदीलही घेतला. इथे टीनची बरीच भांडी मिळाली. प्लास्टिक शक्यतो नको होते ना? तवा, पोळपाट पाहून मनोहर पोट धरधरून हसत होता. एक चांगली ट्रंक स्वस्तात मिळाली. खरं म्हणजे सगळे स्वस्तच होते. पण मन्याला सकाळचा महादुचा शेरा जरा खुपल्यामुळे तो जोरदार घासाघीस करत होता.  आणि मिळणारा डिस्काउंट बघून जाम खुश होता.

संध्याकाळी परतलो तर काय करडे पाटील उभे राहून वरच्या आवाजात ओरडत होते आणि २-४ माणसे धावपळ करीत होती. पाटील फार बिथरले होते वाटतं. “आरं मी जरा कुठं भाईर गेलो तर पाव्हन्यांना तुम्ही पार वाटेलाच लावलं?” आम्ही नुसते बघतच राहिलो. करडे पाटील म्हणजे ह्या शेताचे मालक. आमचा प्लॅन ऐकून आम्हाला ही जमीन आमच्या प्रयोगासाठी हप्त्यांवर दिली होती. आमच्या येडपट आणि खुळ्या कल्पनेला त्यांनी का उचलून धरलं ते अजून आम्हाला कळलेलं नाही. त्यांची विहीर आणि पंप जवळच होते. तिथून त्यांनी एक वायर जोडून आमच्या खोपट-घरात दिवा लावला होता. आम्हाला खरं म्हणजे तो नको होता. पण ते सांगण्याची ही वेळ नव्हती. आम्ही गाडीतून समान काढत होते, तोवर ते आलेच.

“नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार मेजर साहेब.” मी एके काळी डॉक्टर होतो ते त्यांच्या पक्के लक्षात होते. पण मनोहरला तो कर्नल असून सुद्धा मेजर म्हणणे लागले होते. त्याला नजरेनेच मी दाबले. खरं म्हणजे सर्व सामान्य लोकांना या मिलिटरी लोकांची हुद्देवारी कळायला जरा जडच जाते. करडे पाटील तसे एकदम सभ्य, हुशार आणि समजूतदार. शिकले फारसे नसले तरी त्यांचे वाचन जबरदस्त होते. वेषहि साधाच. पायजमा, शर्ट व पांढरी टोपी. पण भरदार मिशा आणि बुलेट फटफटीमुळे त्यांचा रुबाब काही औरच होता. सभोवतालीची  ६०-७० एकर जमीन त्यांचीच होती. आणि ते प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जात होते. सतत भ्रमंती आणि पुणे-कोल्हापूरला खेपा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ झालेले दिसत होते.  

आमची आधी नीट चौकशी केली. काही कमी जास्त लागले तर ते महादुला सांगा, म्हणाले.  मग रात्री त्यांच्या वाड्यावर जेवण्याचे फर्मान सोडले. आम्ही बाजारातून येतांना सगळे सामान आणले होते. पण आमचा सगळा बेत त्यांनी धुळीस मिळवला. मनोहरपंत मात्र खूष झाले. माझ्या हातचे जेवण आज तरी टळले होते. आम्ही मग सर्व सामान लाऊन ठेवले. पण उद्या सकाळची आंघोळीच्या गरम पाण्याची सोय काय हा प्रश्न मला पडला होता. मन्याला मला खिजवण्याचा असा चान्स सोडायचा नसतो. त्याला विहिरीवर अंघोळ करायची होती. आणि मला गरम पाण्याने.


आम्ही हात पाय धुतले. बेसिन, मोरी वगैरे भानगडच नव्हती. होल वावर इज अवर्स असा खाक्या होता. आरसा कंगवा ठेवायला एक जागा मन्याला सापडली. पत्र्याच्या हूक मध्ये. कपडे बदलून जेवायला गेलो. तर काय करडे पाटलांनी जय्यत “सरंजाम” केलेला! मिलिटरी गडी मन्या खुष!  माझी अडचण समजताच ते चटकन रक्त-वारुणी (म्हणजे रेड वाईन हो!) घेऊन आले.  गप्पा तर झाल्याच पण त्यांनी ग्रामीण जीवनाचे भरपूर किस्से सांगितले. मजा आली. जेवण फक्कड गावरान कोंबडीचे होते. पण घरातली एकही बाई वाढायला आली नाही. एक गडीच सगळे बघत होता. असो. या रंगीत जेवणाचा परिणाम एव्हढाच झाला घरी आल्यावर कि मी खाली आणि मनोहर बाजेवर झकास झोपलो. उद्या सकाळपासून आमचे परिक्षेचे दिवस सुरु होणार होते. आमचा उत्साह तगडा होताच, पण पहिला दिवस तरी चांगला पार पडल्याने तसे निश्चिंत होतो.   

पुढे चालू .....