आमचे निसर्ग प्रयोग
मी आणि माझे मित्र काही दिवसांपासून एका खेड्यामध्ये सामुहिक नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयोग करीत आहोत, त्याची ही कहाणी. कशी वाटते ते कळवत रहा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग एक
आमची गाडी मलदापूरला पोचली आणि गाडी पाहून महादू
आमच्या मागे मागेच आला. आमचा प्लॉट तसा गावाबाहेर होता. आणि तिथे एक पत्र्याची मोठी
खोली आणि मागे एक टॉयलेट मागच्या खेपेस बांधून ठेवले होते. आम्ही गाडीतून समान
काढले, खोलीत नेऊन ठेवले. आता पुढे काय? मनोहर माझ्याकडे पहात होता. अन मी
त्याच्याकडे. खाली महादूने जमीन धोपटून ठेवली होती. सारवून पण घेतली होती. पण
आम्हाला काही खाली बसवेना. मनोहरची नजर सांगत होती, “घ्या, निसर्ग जीवन पाहिजे
ना?”
तेव्हढ्यात महादू आला. हातातले कांबळे खाली
अंथरून ‘बसा बसा’ सांगू लागला. मनोहरने शांतपणे बॅग उघडून एक चादर काढली. महादू
तसाच मागे पळाला. आम्ही चादर अंथरून बसतच होतो. तर तो एक खाट घेऊन आला. आम्हीच
लाजलो. आम्ही मग खाटेवरच बसलो. परत महादू गेला आणि कळशी घेऊन आला. आम्ही ग्लास
काढले. मनोहर बिसलेरीची बाटली बॅगेत शोधात होता. माझी नजर पाहून
थबकला आणि मुकाट्याने कळशितले पाणी पिऊ लागला.
आता काय करायचे? मोठे अवसान आणून
निसर्ग जीवन जगायला इथे आलो होतो. म्हणजे आपण होऊनच. मला चहाची सुरसुरी कधीपण
येते. महादुला राम राम केला. त्याची मदत लागणार तर होतीच. पण आधी विचार करायला हवा
होता. छोटा गॅस काढला. चहाची भांडी, दुध पाऊडर, साखर काढून मग मस्त चहा केला. {छे! चहा आता कमीच केला पाहिजे.} जरा हुश्श केले.
मनोहरची टकळी आणि चुळबुळ चालूच होती.
मनोहर यादी घेऊन बाहेर पडला. तसं आमचं
ठरलंच होतं. त्याने बाहेरची आणि मी घरातली कामं करायची. मी पण आधी चवळी काढून एका
पातेल्यात भिजत घातली. आणि जेवणासाठी मुगडाळ व तांदूळ काढले. आधी किचन लावायला
पाहिजे. मग बाहेरचं बघू. महादूला हाक मारली.
हा हरहुन्नरी माणूस करडे पाटलांनीच बघून दिला होता. मदतीला. लागतील तसे
पैसे द्यायचे बोलीवर. महादूच्या मदतीने “घरात”
आणि टॉयलेटमध्ये पाणी ठेवले. मागच्या खेपेस जो काही गवंडी मिळाला त्याच्याकडून हे टॉयलेट
बांधून घेतले होते. आमची कमोडची सवय. गवंड्याने कसे तरी ते जोडलेले. पण ठीक आहे.
हे तर हे.
महादूला एक माठ आणायला सांगितला. आणि इकडे मग खिचडी शिजायला ठेवली. तिखट मीठ
वगैरेच्या पुड्याच आणल्या होत्या. महादू आणि मनोहर एकदमच आले. मनोहरने गावातल्या
दुकानातून जे जे मिळाले ते सर्व आणले. “भाव” न करता सगळी किंमत एकदम दिल्याने
दुकानदार बघतच राहिला होता म्हणे. पण शेवटी नीट विचारपूस करून चहा तर पाजलाच,
शिवाय पैसे ही कमी केले. दुकानदार कानडी अप्पा होता. महादूने सगळ्यांची किंमत
विचारल्यावर लक्षात आले कि गावकऱ्यांपेक्षा जास्त पैसे घेतले होते. मनोहरचा नूर
उतरला. पण मी आणि महादू हसत राहिलो. आमची
खिचडी बघून महादू एकदम बडबड करत माघारी गेला आणि येतांना चांगल्या ४ भाकऱ्या आणि
ठेचा घेऊन आला. मागनं त्याची मुलगी पिठलं, ताक आणि कांदा ही घेऊन आली.
मग बळेबळे आम्ही महादुला जेवायला ठेऊन
घेतले. नाहीतर आम्ही काय एव्हढे जेवणार होतो? मी ६२ चा तर मनोहर ६३चा. महादू वाटत
होता ५०-५२चा. वय विचारलं तर तो म्हणाला ७२. आम्ही उडालोच. त्याची एक मुलगी शहरात
दिली होती. जावई एका कारखान्यात काम करी होता. आणि “दर महिन्याला” रोख पगार घेत
होता. खुश होता महादू. पण त्याला हेच समाजत नव्हतं कि हे चांगले साहेब लोक या
खेड्यात आणि खोपटात कशाला आलेत? काय सांगणार त्याला कि आम्हालाच आता ते खोटं खोटं
जीवन नकोसं झालंय. जरा निसर्गाच्या सान्निध्यात मस्त जगायचं आहे. जसं हवं तसं
राहायचं आहे. दोस्त, समविचारी, समानधर्मी स्त्री-पुरुषांना बरोबर घेऊन
एकत्र झकास दुसरी इनिन्ग्स खेळायची आहे. या जीवनाचा रस पुरेपूर चोखायचा
आहे.
जेवणं झाल्यावर जरा आडवा होऊन, (म्हणजे
मी बाजेवर व मन्या खाली) तडक गाडी तालुक्याच्या गावाकडे वळवली. मनोहरने सकाळीच दोन
लोखंडी कॉटची मागणी नोंदवून ठेवली होती. दोघांना दोन लोखंडी पलंग. महादूची बाज परत
करायलाच हवी होती. मग आणखी काही लोखंडी समान मागवले. खोपटाची मापं सकाळीच घेऊन ठेवली होती. मग इतर बरेच सटर-फटर सामान खरेदी करून डिक्कीत
टाकले. एक कंदीलही घेतला. इथे टीनची बरीच भांडी मिळाली. प्लास्टिक शक्यतो नको होते
ना? तवा, पोळपाट पाहून मनोहर पोट धरधरून हसत होता. एक चांगली ट्रंक स्वस्तात
मिळाली. खरं म्हणजे सगळे स्वस्तच होते. पण मन्याला सकाळचा महादुचा शेरा जरा
खुपल्यामुळे तो जोरदार घासाघीस करत होता.
आणि मिळणारा डिस्काउंट बघून जाम खुश होता.
संध्याकाळी परतलो तर काय करडे पाटील
उभे राहून वरच्या आवाजात ओरडत होते आणि २-४ माणसे धावपळ करीत होती. पाटील फार
बिथरले होते वाटतं. “आरं मी जरा कुठं भाईर गेलो तर पाव्हन्यांना तुम्ही पार वाटेलाच
लावलं?” आम्ही नुसते बघतच राहिलो. करडे पाटील म्हणजे ह्या शेताचे मालक. आमचा प्लॅन
ऐकून आम्हाला ही जमीन आमच्या प्रयोगासाठी हप्त्यांवर दिली होती. आमच्या येडपट आणि
खुळ्या कल्पनेला त्यांनी का उचलून धरलं ते अजून आम्हाला कळलेलं नाही. त्यांची
विहीर आणि पंप जवळच होते. तिथून त्यांनी एक वायर जोडून आमच्या खोपट-घरात दिवा
लावला होता. आम्हाला खरं म्हणजे तो नको होता. पण ते सांगण्याची ही वेळ नव्हती. आम्ही
गाडीतून समान काढत होते, तोवर ते आलेच.
“नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार मेजर
साहेब.” मी एके काळी डॉक्टर होतो ते त्यांच्या पक्के लक्षात होते. पण मनोहरला तो
कर्नल असून सुद्धा मेजर म्हणणे लागले होते. त्याला नजरेनेच मी दाबले. खरं म्हणजे
सर्व सामान्य लोकांना या मिलिटरी लोकांची हुद्देवारी कळायला जरा जडच जाते. करडे
पाटील तसे एकदम सभ्य, हुशार आणि समजूतदार. शिकले फारसे नसले तरी त्यांचे वाचन
जबरदस्त होते. वेषहि साधाच. पायजमा, शर्ट व पांढरी टोपी. पण भरदार मिशा आणि बुलेट
फटफटीमुळे त्यांचा रुबाब काही औरच होता. सभोवतालीची ६०-७० एकर जमीन त्यांचीच होती. आणि ते प्रगत
शेतकरी म्हणून ओळखले जात होते. सतत भ्रमंती आणि पुणे-कोल्हापूरला खेपा यामुळे
त्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ झालेले दिसत होते.
आमची आधी नीट चौकशी केली. काही कमी
जास्त लागले तर ते महादुला सांगा, म्हणाले.
मग रात्री त्यांच्या वाड्यावर जेवण्याचे फर्मान सोडले. आम्ही बाजारातून
येतांना सगळे सामान आणले होते. पण आमचा सगळा बेत त्यांनी धुळीस मिळवला. मनोहरपंत
मात्र खूष झाले. माझ्या हातचे जेवण आज तरी टळले होते. आम्ही मग सर्व सामान लाऊन ठेवले.
पण उद्या सकाळची आंघोळीच्या गरम पाण्याची सोय काय हा प्रश्न मला पडला होता. मन्याला
मला खिजवण्याचा असा चान्स सोडायचा नसतो. त्याला विहिरीवर अंघोळ करायची होती. आणि
मला गरम पाण्याने.
आम्ही हात पाय धुतले. बेसिन, मोरी
वगैरे भानगडच नव्हती. होल वावर इज अवर्स असा खाक्या होता. आरसा कंगवा ठेवायला एक
जागा मन्याला सापडली. पत्र्याच्या हूक मध्ये. कपडे बदलून जेवायला गेलो. तर काय
करडे पाटलांनी जय्यत “सरंजाम” केलेला! मिलिटरी गडी मन्या खुष! माझी अडचण समजताच ते चटकन रक्त-वारुणी (म्हणजे
रेड वाईन हो!) घेऊन आले. गप्पा तर झाल्याच
पण त्यांनी ग्रामीण जीवनाचे भरपूर किस्से सांगितले. मजा आली. जेवण फक्कड गावरान
कोंबडीचे होते. पण घरातली एकही बाई वाढायला आली नाही. एक गडीच सगळे बघत होता. असो.
या रंगीत जेवणाचा परिणाम एव्हढाच झाला घरी आल्यावर कि मी खाली आणि मनोहर बाजेवर
झकास झोपलो. उद्या सकाळपासून आमचे परिक्षेचे दिवस सुरु होणार होते. आमचा उत्साह तगडा होताच, पण पहिला दिवस तरी चांगला पार पडल्याने तसे निश्चिंत होतो.
पुढे चालू .....
पुढे लिहावे ...वाट पाहत आहे.
ReplyDeleteपुढे लिहावे ...वाट पाहत आहे.
ReplyDelete