Thursday, January 14, 2016

दोन

सकाळी म्हणजे पहाटे लख्ख जाग आली तीच कोंबड्याच्या आरवण्याने. बाहेर आलो आणि हा:, इथे आल्याचं सार्थक झालं. सगळीकडे नीरव शांतता. छे: हे शब्द फार लहान आहेत ती शांतता अनुभवायला. मी नुसताच एका दगडावर बसून होतो. समोर एका दिशेला किंचित फटफटायला सुरुवात झाली होती. आणि बाकी सगळी निळी शांतता. लांब कुठेतरी काही पक्षी, मोर यांचे आवाज येत होते. बस बस! यार आम्हाला हेच हवे होते. या शांततेमध्ये हजार प्राणायामांची ताकद होती. मनोहर देखील हळूच येऊन बसला. सूर्य महाराज वर आल्यावर मग आम्ही प्रसन्न हसलो. आणि परत खोपटात.
सगळं आटपून होतंय तो लगेच मनोहर महाराजांना भूक लागली. कालच्या बाजारातले बटाटे बाहेर काढले. खोपटाच्या बाहेर एक शेकोटी पेटवली. आणि बटाटे भाजायला सुरुवात केली. मन्याने लगेच ते काम उत्साहाने हातात घेतले. मी चहाकडे वळलो. आणि काय राव. त्या दिवशी आमचा खरा निसर्ग-नाश्ता झाला. मीठ लावलेले व भाजलेले बटाटे आणि रताळी. ऐसा मजा आया. पण पोट भरल्यावर बघितलं, जरा धूर झाला होता. या धुराचा वास सुद्धा मस्त येत होता. पण नाही. हा धूर सुद्धा चांगला नाही. डोक्याच्या पोतडीत काय सापडतंय ते बघायला लागलो. दोन चार कल्पना उगवल्या होत्या. ठीक आहे. करून बघू या. मनोहरला पण त्या लगेच आवडल्या.  ते एक नवलंच. कारण काही नवीन करायचं ठरवला कि पहिला बहुधा नकारच ! नंतर हजार प्रश्न आणि शंका असतात. मिलिटरीमध्ये डोकं वापरायला बंदीच असते कि काय? 
बुलेट फटफटीचा आवाज आला आणि करडे पाटील हजर. तेही हाफ पँटमध्ये. मनोहर पण अर्ध्या चड्डीचा वेडा. मग काय चहाबरोबर पुन्हा एकदा गप्पा. गाडीच्या डिक्कीतून त्यांनी दोन लांब मुळे काढले. तेव्हढ्यात महादू हजर झाला. मालक आले होते ना. आमच्याकडे पाण्यासाठी दोन प्लास्टिकच्या बादल्या आणि एक माठ एव्हढेच होते. त्याने ते लगेच भरून टाकले. टॉयलेटमध्ये पाणी भरले. आणि आज्ञाधारकपणे उभा राहिला. चहा दिला तरी तो घेईना. “तुम्ही दूध कुठनं आनलं?” पाटील गरजले. आणि ‘पावडर’ ऐकून ते रिकाम्या कपाकडे हळहळत पाहू लागले. मग लगेच महादुला ऑर्डर. “उद्यापासून रोज यांच्याकडे आपले घरचे दुध घालायचे.” आज ना उद्या आम्हाला ही व्यवस्था करायचीच होती. “अवो, घरी दोन दोन गायी-म्हशी हायेत, आन आमी दूध इकत पन नाही.”  आम्ही पण बाजारभावाप्रमाणे पैसे द्यायचं ठरवून टाकलं.
करडे पाटील जाईपर्यंत विहिरीचा पंप सुरु झाला. मग मन्या लगेच उड्या मारीत गेला. मी नाईलाजानं पोचलो. पंपाच्या थंड पाण्याखाली उभं राहतांना शहारे आले. पण लगेच त्यातच मजा वाटू लागली.  मग कपडे पण धुवून तिथेच वाळत घातले. मन्याने तिथेच दाढी पण उरकली. आम्ही मग मस्त मोठ्या-मोठ्याने गाणी म्हणत शेताला फेरी मारत घरी परतलो. असं आम्ही गेल्या कित्येक दशकात केलं नव्हतं. घरी आलो तर मन्याचा फोन वाजत होता. आणि पुढचे १५ मिनिटे तो पडत्या चेहेऱ्याने हुं हुं करत होता. तो वहिनींचा होता हे सांगण्याची गरजच नव्हती.   आल्यापासून आम्ही दोघांनी आमचे फोन मुद्दामच बंद ठेवले होते. त्याने कधी चालू केला कोण जाणे. आता मी फोन चालू करून आधीच आपणहून घरी फोन करून पुढचे (सं)भाषण टाळायचा (अयशस्वी) प्रयत्न  केला. असो.

मनोहर मग गावात गेला आणि मी स्वैपाकास लागलो. थालीपीठे, चवळीची उसळ आणि मुळ्याची कोशिंबीर (हा: हा:  हा काय बेत आहे??) करावी म्हटलं तर किसणी कुठे आणली होती. महादुला विचारायला गेलो तर त्याने मुळे किसुनच आणून दिली आणि वर एका मडक्यात दही पण आणून दिले. वा:!  माझी थालीपीठाची धडपड पाहून “कशा पायी एव्हडी गडबड? म्या भाकऱ्या आणून देतो न जी” असं म्हणायला लागला. त्याला काय माहिती आम्हाला काय किडा चावलाय? खरी पंचाईत खाली बसून थालीपीठे थापण्यात होती. एव्हढी योगासने करतोय तरी शरीर आपले कडक ते कडकच. जरा खाली बसलं कि रग लागलीच. आणि सभोवतालचा पसारा पाहून तर डोकं फिरायची वेळ आली. सगळीकडे पीठ, तेल सांडलेलं. कचरा तिथेच. शेवटी एकदाचा स्वैपाक संपवला आणि साफसफाई करून “साहेबांची” वाट पहात बसलो.
मनोहर आला एकदाचा. सोबत एक टेम्पो आणि दोन माणसं पण. लोखंडी खाटा आणि एक लोखंडी टेबल उतरवून घेतलं. आणि काय काय घेऊन आला होता. पण आता जेवायची घाई होती त्याला. जेवण विश्रांती झाल्यावर मग आम्ही आमचे कुकिंग टेबल कम डायनिंग टेबल कम स्टोअर प्लेस अशी त्या लोखंडी टेबलाची व्यवस्था एका कोपऱ्यात लावली. दोन तीन प्लास्टिकची स्टूलं ठेवली. एका ट्रंकेत सगळी धान्ये, मसाले, पीठं यांचे डबे, पिशव्या निट लावल्या. पण बाहेरच्या बाजूला बादलीतल्या पाण्यात भांडी धुणे कसं तरी वाटत होतं. एक सिंक पाहिजे होतं. अजून बरंच काही करायचं होतं!  
मग एक मोठा माठ आणला होता, त्याचा फ्रीज केला. कसा? सोप्प आहे. भाज्या आणि घट्ट बंद बाटलीतून पाणी आणि दुध एका लांबट मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत घातलं. पिशवीचं तोंड बांधून माठाबाहेर लोंबकळत ठेवलं. आणि मग माठ पाण्याने भरून घेतला. झाला आमचा फ्रीज. यात बर्फ वगैरे होणार नव्हतं पण भाज्या आणि दूध ताजं राहणार होते. हा प्रयोग मनोहर नीट बघत होता.  त्याच्या शंका सुरु झाल्याच. “पण पाणी संपलं तर? आणि दूध नासलं तर? आज पाणी आहे. उद्या नसेल. मग?”
“जरा थांब, आपण प्रयोग करतो आहोत असं समज. दोन-तीन दिवसात सगळं स्पष्ट होईल. आणि पाणी हे आपल्याला रिसायकल करता येईल. माठाखाली एक बादली ठेवली कि झालं!”
खरा प्रश्न त्याला बर्फाचा पडला असावा. पण सांगणार कसं? खरं म्हणजे बर्फ कधी आणि किती लागतं? आपल्या घराच्या फ्रीजचा वापर ९०% दूध आणि भाज्या, चिकन साठीच होतो. बर्फ कधीतरीच. उन्हाळ्यात आईसक्रिम किंवा चॉकलेटसाठी ! बस! एव्हढ्यासाठी दरमहा ५०० ते १००० रु. भरणे जरा अन्यायच आहे. हा आमचा फ्रीज जवळ जवळ फुकट आहे. फक्त आता त्याची उपयुक्तता सिद्ध होणे बाकी होते. म्हणजे मनोहरला. मी हा प्रयोग घरी केलाच होता. आणि १००% यशस्वी झाला होता.
आता दुसरा प्रश्न गॅसचा होता. सध्याचा आमचा छोटा गॅस जेमतेम १५-२० दिवस पुरला असता. तोपर्यंत काही तरी स्थानिक सुरक्षित सोय व्हायला हवी होती.  कल्पना होत्या पण प्रयोग करायला हवे होते. मी एक कागद घेतला आणि काही आकृत्या तयार केल्या. आणि चहा (हा हा) करीपर्यंत मनोहरला समजावून सांगत बसलो. मनोहरच्या शंका आणि प्रश्नांची उत्तरे देता देता माझी भंबेरी उडाली. पण शेवटी मी माघार घेतली आणि सांगितलं कि बस आता यापुढे माझे डोके  चालत नाही. आता मनोहर साहेब खुशीत आले. “आता मी बघतो”  इंजिनियर तो आणि त्याच्या क्षेत्रात लुडबुड माझी. कशी चालेल त्याला (किंवा कुणालाच)? लगेच गाडी काढून तो गावात गेला. मी आपला निसर्गाशी गप्पाटप्पा करायला बाहेर पडलो.
एक ओढा लागला त्याच्या काठा-काठाने चालू लागलो तर तो मला अशा एका अफलातून ठिकाणी घेऊन गेला कि बस. एक टेकडीला वळसा घालून तो एका तळ्याच्या काठी घेऊन गेला. ते तळे एका बाजूला घाण दिसत होते, पण दुसऱ्या बाजूला मात्र अतिशय सुंदर होते. संध्याकाळची वेळ. वारा तसा नव्हताच. वर निळ्याभोर आकाशात पक्षी आणि खाली मी. समोर स्तब्ध पाणी. कुठून तरी म्हशी आणि मागे एक गुराखी आल्यावर मी मग वळलो. येतांनाचा ओढा हि सापडेना. मग त्या गुराख्याला विचारीत विचारीत एकदाचा घरी पोचलो.

आता जेवणाचा प्रश्न होता. खिचडीचा पर्याय होताच. शिवाय दोन तीन कांदे गॅसवर भाजले. खिचडीवर लसणाची फोडणी घातली. पापड आणलेच नव्हते. आणि महादुला मागणे म्हणजे लाज शिवेवर टांगणे. तेव्हा मिरचीचा ठेचा केला. मनोहर आला तो वैतागूनच. त्याला कोणी चांगला फॅब्रीकेटर भेटला नव्हता.  भेटले ते असे की यानेच डोके धरून माघार घ्यावी.  मी त्याची समजूत घातली. असे डोके लावून काम करणारी माणसे तालुक्याच्या गावीच मिळतील. खिचडी, कांदा, ठेचा पाहून गडी खुशीत आला.  मग दुपारचे डिझाईन काढून आम्ही परत त्यात डोकं घालून बसलो, अगदी चांगली झोप येईपर्यंत. 

No comments:

Post a Comment